नीलेश वाघ, सुरगाणा, नाशिक : आता बातमी एका गावाची. एक अख्खं गाव गुलाबी (Pink village) रंगात रंगलंय. अतिशय दुर्गम भागातलं हे गाव. जिथे काही वर्षांपूर्वी विकास म्हणजे काय हे माहीतही नव्हतं. पण गावात एका शिक्षकाची बदली झाली आणि हे गाव गुलाबी झालं. (A teacher was transferred to the village and the village turned pink) काय आहे या गावाचं गुलाबी गुपित. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यात भिंतघर गावात असं तुमचं गुलाबी स्वागत होतं. अतिदुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं  हे टुमदार गाव. या गावाचे रुपडं पालटलं ते शिक्षक जितेंद्र गवळी यांनी. या गावातल्या बर-याचशा मुली शिकत नव्हत्या. गवळी यांनी घराघरात जाऊन शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितले. आणि मुलींची शाळेतली हजेरी वाढली. मुलींनी शिकावं आणि गावात महिलांचा आदर वाढावा म्हणून गुलाबी गावाची आयडिया पुढे आली. गावानंही गुरुजींना साथ दिली. आणि पाहता पाहता गावातली सगळी घरं गुलाबी झाली. 


याबाबत शिक्षक जितेंद्र गवळी म्हणाले, मी 2008 मध्ये इथे प्राथमिक शिक्षक म्हणालो त्यावेळी मला मुलींचे शाळेतील प्रमाण अल्फा दिसलं मुली शाळेत येत नव्हत्या लवकर लग्न लावून दिली जात होती. मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी मी ग्रामस्थांची मिटिंग घेतली मुलगी शाळेची संख्या वाढवली यापुढेही महिला सबलीकरण व्हावे मुली शाळेत यावे म्हणून हे गाव पिंगा गाव म्हणून समोर आले. त्यामुळे येथील पालकांना मुली शाळेत पाठवण्याची प्रेरणा मिळत राहिली गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून हे संपूर्ण गाव पिंक व्हिलेज म्हणून तयार केला आणि हे गाव जसं जयपुर पिंक सिटी आहे तसेच म्हणून राज्यात नावारूपाला आले.


जवळपास ८० कुटुंबं आणि ४०० लोकसंख्या असलेलं हे भिंतघर राज्यातलं पहिलं गुलाबी गाव ठरले आहे. गावात नीटनेटके रस्ते, एक घर एक झाड. प्रत्येक घरासमोर पक्षांसाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात दारूबंदीही करण्यात आलीयत. 



पूर्वी हे गाव हिरमाळ म्हणून ओळखले जायचे एकाने दगडाची भिंत बांधली त्यामुळे  गावाचे नाव भिंतघर नाव गावकऱ्यांच्या एकाकीतून हे गुलाबी गाव उभे राहिले. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. गावकऱ्यांना  आनंद झाला. अश्याच आमच्या संकल्पना आहे. या गावातून आम्ही असा संकल्प करतो की असे पाच गावे उभे करू, असे विठठल गावित यांनी सांगितले.         


सुरगाण्याच्या अतिदुर्गम भागात एक गुलाबी गाव उभे राहू शकते आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला तर विकासही होऊ शकतो. गाव करील ते राव काय करील, हे भिंतघरमध्ये आल्यावर पटते. भिंतघरने करुन दाखवले. इतर गावांनीही अशीच गुलाबी प्रेरणा नक्की घ्यावी.