मोदींना प्रदान केलेला लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तरी काय? जाणून घ्या पुरस्काराचा इतिहास
What Is Lokmanya Tilak National Award: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज हा पुरस्कार पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते.
Lokmanya Tilak National Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यानंतर मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे अशा मान्यवरांना आम्ही सन्मानित करतो असं आयोजकांनी या पुरस्काराबद्दल आधीच सांगितलं होतं. मात्र आज पंतप्रधान मोदींना ज्या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती ठाऊक आहे का? या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात कधी झाली होती? हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आहे? हा पुरस्कार किती महत्त्वाचा आहे? याचसंदर्भात जाणून घेऊयात..
कधीपासून दिला जातो हा पुरस्कार?
पंतप्रधान मोदींना दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 1983 रोजी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने केली. हा पुरस्कार दरवर्षी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रदान केला जातो. लोकमान्य टिळक हे 20 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामधील प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
कसं आहे या पुरस्काराचं स्वरुप?
बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वराज्याचे समर्थक होते. टिळकांनी लोकांना संघटित होण्याचा संदेश दिला. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी त्या अनन्यसाधारण नेतृत्व आहे. लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून मोदींनी महत्त्वाचं काम केलं आहे. मोदींच्या या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी यंदाच्या 41 व्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, असं ट्रस्टने म्हटलं आहे. या पुरस्काराचं स्वरुप स्मृतीचिन्ह, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं आहे.
ट्रस्टमध्ये कोण?
टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक आहेत. टिळक हे काँग्रेस समर्थक म्हणून ओळखले जातात. लोकमान्य टिळकांनीच काँग्रेसला लोकांपर्यंत नेण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे दाखले दिले जातात. दीपक टिळक यांचे वडील जयंतराव टिळक यांनी हिंदू महासभेमधून कामाला सुरुवात केली. मात्र 1950 च्या दशकामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार आणि नंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे अध्यक्ष झाले.
कोणाकोणाला देण्यात आला आहे हा पुरस्कार?
पंतप्रधान मोदींच्या आधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा आणि प्रणब मुखर्जींना प्रदान करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच एस. एम जोशी, शरद पवार त्याशिवाय प्रसिद्ध उद्योजक आर. नारायणमूर्ती, मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ई. श्रीधरन यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एकूण 40 जणांना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आला आहे.