Nagpur News : आज, 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Nagpur) यांच्या दौऱ्यामुळे शहरातील अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करून काही प्रमाणात वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही मार्गांवर अवजड वाहनांचा प्रवेशही बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीला आणि नागरिकांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून पोलिसांकडून अनेक व्यवस्था करण्यात आल्या  आहेत. पंतप्रधानांसह, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्र्यांची देखील या कार्यक्रमात उपस्थिती असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणामी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी असेल. सकाळी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी संत्रा बाजाराच्या रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


'हा' रस्ता बंद असणार


झिरो पॉइंट ते समृद्धी महामार्ग (samruddhi mahamarg) (वायफळ टोल प्लाझा), हिंगणा गावातून झिरो पॉइंटकडे येणारा रस्ता अमरावती रोडवरून वर्ध्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांसाठी आणि जबलपूर रोडवरून अमरावतीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी बंद राहील. अमरावती रोडवरून वर्ध्याकडे जाणारी वाहने मोंढा फाट्यावर उजवीकडे वळण घेऊन कान्होलीबारा रोडवरून बुटीबोरी रोडचा वापर करू शकतात.


वाचा: मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी 


अमरावती रोडवरून जबलपूरकडे आणि भंडारा रोडवरून वर्धा, अमरावतीकडे जाणारी वाहने पारडी चौक, ऑटोमोटिव्ह चौक, मानकापूर चौक, न्यू काटोल नाका चौक, दाभा टी पॉइंट, वाडी टी पॉइंट, अमरावती रोडचा वापर करतील. वर्धा रोडकडून नागपूर शहरात येणारी वाहने बुटीबोरी येथून वळवण्यात येणार आहेत. व्हीआयपी मुव्हमेंटच्या काळात आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याचे अधिकार पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 


नागपुरातील 'हे' मार्ग बंद राहणार 


• रेल्वेस्टेशन परिसरातील मुख्यद्वार सामान्य प्रवाशांसाठी सकाळी 7.30 ते 11 वाजतापर्यंत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील नागरिकांना पूर्वेकडील द्वारातून (संत्रामार्केट) प्रवेश घ्यावा लागणार आहे. 
• आरबीआय ते एलआयसी मार्ग बंद
• सदर ते जयस्तंभ चौकापर्यंतचा रस्ता बंद करण्यात येईल.
• रामझुल्यावरील रहदारीही या काळात बंद करण्यात येणार आहे.
• लोहापूल ते मानस चौकांपर्यतची वाहतूक बंद करण्यात येईल.
• वर्धामार्गावरील पंतप्रधानांच्या ताफ्याच्या वाहतुकीदरम्यान उड्डाणपूलही यावेळी बंद करण्यात येईल.


वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार 


पंतप्रधानांचा ताफा रेल्वेस्थानकाकडे (Nagpur Railway Station) निघून गेल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे. थोडक्यात, पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना, त्या-त्या ठिकाणची वाहतूक काही वेळेसाठी बंद राहणार आहे. नागरिकांना याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचं शहर पोलिसांकडून सागंण्यात आलं आहे.