बीड : बीड पोलीस दलातला श्वान रॉकीचं ५ ऑगस्टला निधन झालं आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने रॉकीवर अंत्यसंस्कार केले त्या सद्भावनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये कौतुक केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉकीचं निधन झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सलामी दिली होती. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीड पोलिसांच्या याच कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. बीड पोलीस रॉकीला शेवटचा निरोप देणारे ते दृश्यं भावूक करणारं होतं. रॉकीने ३०० पेक्षा जास्त केस सोडवण्यात पोलिसांची मदत केली, असं पंतप्रधान म्हणाले. 


५ ऑगस्टला रॉकी शहीद झाला. ३५० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा छडा रॉकीने लावला होता. गेली ८ वर्ष तो बीडच्या पोलीस दलात काम करत होता. आजारपणामुळे त्याचं निधन झालं. रॉकीने २०१६ साली कर्नाटकच्या मैसुरमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. खून आणि दरोड्यांसारख्या गुन्ह्यांचा तपास रॉकीने लावला होता. अगदी कोरोनाच्या संकटकाळातही सोशल डिस्टन्सिंग कसं पाळायचं, हे सुद्धा रॉकीला माहिती होतं. 


रॉकीच्या निधनानंतर गृहमंत्र्यांनीही त्याला श्रद्धांजली वाहिली होती. एखाद्या योद्ध्याप्रमाणे बीड पोलिसांनी रॉकीला निरोप दिला. कोरोनाच्या काळात बऱ्याच वेळा माणूसही नाती विसरतोय. तिथे रॉकीसाठी पोलिसांनी काढलेली अंत्ययात्रा आणि त्याच्यासाठी दाखवलेली कृतज्ञता फारच सुंदर आहे.