`राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी...`; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट
Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्स अकाऊंटला टॅग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही खास पोस्ट केली आहे. मोदींनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.
Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या साऱ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची फारशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसत नाहीये. मात्र अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना टॅग करुन पोस्ट
"महाराष्ट्राचे डायनॅमिक आणि इंडेस्ट्रीयस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!" असं म्हणत मोदींनी त्यांच्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांना टॅग करुन पोस्ट केली आहे. "अगदी तळागाळातील लोकांशी असलेल्या संवादामुळे त्यांनी आपल्या कामाची आणि कष्टाळू स्वभावाची छाप सोडली आहे. राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी ते काम करत आहेत, त्यांच्या दिर्घ आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
शिंदेंवर राऊतांनी केला गंभीर आरोप
एकीकडे पंतप्रधान मोदींनी शिंदेंना शुभेच्छा दिलेल्या असल्या तरी आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विरोधकांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या कारभारावर टीका केली जात आहे. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. मात्र या प्रकरणानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मॉरिसचा मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच कथित पद्धतीने 4 दिवसांपूर्वी झालेल्या भेटीचा असल्याचा दावा केला आहे.
नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार
"महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश नारोन्हा 4 दिवसांपूर्वीच 'वर्षा' बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिसला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले," असा दावा राऊत यांनी केला आहे. "वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय. आज त्याने (मॉरिसने) अभिषेकवर गोळ्या चालवून (त्याचा) बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी," असंही राऊत हा फोटो शेअर करत म्हटलं.
दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलिसांनी शुक्रवारी मेहुल पारेख आणि परमार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मॉरिस आणि घोसाळकर या दोघांमध्ये फेसबुक लाईव्हवरील व्हिडीओ वगळता आधी नेमकं काय घडलं याचा शोध पोलीस घेत आहेत.