कोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे. जळगावमधील 'लखपती दीदी' योजनेसंदर्भात आयोजित कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी महिलांविरोधातील  गुन्हा हे पाप अक्षम्य आहे. दोषी कोणीही असला तरी वाचला नाही पाहिजे. त्याला कोणत्याही रुपात मदत करणारे वाचले नाही पाहिजेत असं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महिलांची सुरक्षा ही देशाची प्राथमिकता आहे. लाल किल्ल्यावरुन मी वारंवार विषय उचलला आहे. महिलांना होणारा त्रास मी समजू शकतो. मी देशातील प्रत्येक राजकीय पक्ष, राज्य सरकारांना सांगू इच्छितो की, महिलांविरोधातील गुन्हा हे अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असला तरी वाचला नाही पाहिजे. त्याला कोणत्याही रुपात मदत करणारे वाचले नाही पाहिजेत. शाळा, रुग्णालय, कार्यालय किंवा पोलीस व्यवस्था जिथे कुठे दिरंगाई होईल तिथे कारवाई झाली पाहिजे. वरपासून खालपर्यंत स्पष्ट संदेश गेला पाहिजे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 



"सरकार येईल, जाईल पण जीवन रक्षा आणि महिलांची रक्षा सरकार आणि समाजासाठी दायित्व आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी कायद्यातही बदल करत आहोत. वेळेवर गुन्हा दाखल होत नाही, सुनावणी वेळेत होत नाही, खटल्याला वेळ लागतो अशा तक्रारी आधी येत होत्या. अशा अनके समस्या भारतीय न्याय संहितामध्ये बदलल्या आहेत. महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी संपूर्ण चॅप्टर आहे. पीडित महिलेला पोलीस ठाण्यात जायचे नसेल तर ती घरून ई-एफआयआर करु शकते. तिथे टाळाटाळ होणार नाही याची खात्री घेतली आहे. वेगाने तपास करण्यासाठी आणि शिक्षा होण्यासाठी यामुळे मदत मिळेल," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. 
 
"अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारासाठी फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून केलेल्या अत्याचाऱ्याच्या बाबतही कठोर कायदा केला आहे. आधी यासंबंधी कायदा नव्हता. पण आता नव्या कायद्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकार महिलांविरोधातील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सोबत आहे. पापाची ही मानसिकता आपल्याला थांबवावी लागेल," असा निर्धार नरेंद्र मोदींनी केला आहे.