मोदीही पंडित नेहरुंसारखेच वागले, त्यांचा निर्णय योग्यच- शरद पवार
यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती.
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह येथील दौऱ्याचे समर्थन केले. १९६२ साली युद्धात आपला पराभव झाला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हेदेखील प्रत्यक्ष सीमारेषेवर LAC गेले होते. या दोघांनीही भारतीय सैनिकांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. आपल्या सध्याच्या पंतप्रधानांनीही तेच केले. जेव्हा अशाप्रकारचा प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्त्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच पाहिजेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक निशस्त्र का गेले, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आक्षेप शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत खोडून काढला होता. भारताला आंतरराष्ट्रीय कराराचे पालन करावे लागत असल्याचे पवार यांनी म्हटले होते.
भारत-चीन तणाव : १९६२ वर्ष आठवा.... पवारांचा राहुल गांधींवर निशाणा
तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौकिमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार झाला पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी मोदींच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.