पुणे : पुण्यातील PMPML चालक, कंडक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सलग तिसऱ्या दिवशी चालकाला मारहाणीची घटना समोर आलीय. रस्त्यावरून जाताना दुचाकी चालकाला हटकल्याच्या रागात बाईकस्वारांनी बस चालकाला मारहाण केली. स्वारगेट डेपोची (Swargate Depot) बस पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार बससमोर आडवे आले. त्याला बस चालकाने हटकल्याने राग आला. आणि बस चालकाशी वाद घातला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा वाद पेटला आणि तरुणांनी चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी सुरू केली. चालकाला मारताहेत हे पाहून बस कंडक्टरनेही मध्यस्थी केली. पण, कंडक्टरलाही तरुणांनी मारहाण केली .ही तुफान हाणामारी प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात शूट केली. यावरून चालक, कंडक्टर किती असुरक्षित आहेत हे दिसून येतंय. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तरुणांना अटक करण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्येही चालकाला मारहाण करण्यात आली होती. 



मारहाणीमुळे वाहतूक कोंडी
हाणमारीच्या या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ज्या परिसरात ही घटना घडली तो रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये बससमोर बाईक काढायला लावली या रागातून एका तरुणाने चालकाला मारहाण केली होती.