नितेश महाजन, झी २४ तास, जालना: दुष्काळाच्या काळात माणूसकी लयाला गेल्याचा प्रकार जालन्यात समोर आला आहे. येथील देशगव्हाण परिसरात अज्ञात व्यक्तीने गावातील एकमेव विहिरीच्या पाण्यात विष कालवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळामुळे या भागात पाण्याचे मोजकेच साठे उरले आहेत. देशगव्हाण गावातील ग्रामस्थ डिगांबर पालवे यांनी दुष्काळामुळे गावकऱ्यांची आणि जनावरांची पाण्यासाठी फजिती होऊ नये म्हणून स्वतःच्या शेतातील  विहीरीजवळ खड्डा खोदून पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी ते याठिकाणी आले तेव्हा पाण्यात विष टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामुळे नागरिकांची आणि जनावरांची चांगलीच गैरसोय झाली आहे.  


याच विहिरीवरून देशगव्हाण गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी पाणी भरतात. याशिवाय गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खड्डा खोदून त्यात विहिरीतील पाणी सोडले जात होते. या खड्ड्यात देखील विष टाकण्यात आले आहे. गावातीलच व्यक्तीने पूर्व वैमनस्यातून हा प्रकार केल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. या घटनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.