Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातील लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त आंदोलकांनी 12 बसेस पेटवून दिल्या आहेत. एकट्या शहागड बस स्थानकात 6 बसेस पेटवून देण्यात आल्या आहेत.  जालनातल्या लाठीचार्जचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संभाजीनगर बीड बायपासवर रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.


बीड बंदची हाक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या बीड बंदची हाक देण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं  - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


जालन्यातला लाठीचार्जचा प्रकार दुर्दैवी आहे, तो संयमानं घ्यायला हवा होता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी झी २४ तासशी फोनवरुन संवाद साधला. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. सगळ्यांनी शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झी 24 तास वरुन केले आहे. 


मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत 12 पोलीस कर्मचारी जखमी


जालन्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत 12 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलीय. या पोलीस कर्मचा-यांवर उपचार सुरू आहेत. जालन्याच्या घटनेवरून राजकारण करणं अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  या घटनेची चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय. 


हवेत गोळीबार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप


हवेत गोळीबार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे.  लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवारांनी केली. तसंच लाठीचार्ज करणारं निर्दयी सरकार असल्याचीही टीकाही वडेट्टीवारांनी केली.


गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार लाठीचार्ज झाला का? 


जालन्यातील घटना अत्यंत निषेधार्ह आहे. गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार लाठीचार्ज झाला का? याची चौकशी व्हायला हवी असं सांगत एकनाथ खडसेंनी आपला रोख थेट देवेंद्र फडणवीसांकडे वळलाय. 


मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारनं काय पावलं उचलली?


मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारनं काय पावलं उचलली, असा सवाल मराठा आरक्षण समन्वयक विनोद पाटील यांनी केलाय. लाठ्याकाठ्यांची भाषा बंद करावी, असंही त्यांनी म्हटलंय.