मुंबई : ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं शुक्रवारी डोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सवर कारवाई सुरू केलीय आहे. गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाचं सील तोडून पोलिसांनी पंचनामा करायला सुरवात केली. यावेळी गुंतवणूकदारांनी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. गुडविन ज्वेलर्सच्या विविध स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. दिवाळीआधीपासूनच दुकानाला टाळं ठोकून गुडविनचे मालक केरळमध्ये परागंदा झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या व्याज दाराचे आमिष दाखवून तसेच पाच वर्षांत दुप्पट रक्कम देण्याचे सांगून गुडविन ज्वेलर्सच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. जास्तीचे पैसे मिळणार म्हणून काहींनी निवृत्तीचे पैसे तर कोणी आयुष्यभराची कमावलेली रक्कम या ठिकाणी गुंतवली आहे. मात्र मुदत संपूनही त्यांचे व्याज आणि मूळ रक्कम मिळत नसल्याने काही जण याची मागणी करण्यास गेले. त्यावेळी दुकानाचे मालक पसार झाल्याचे पुढे आले. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न गुंतवणूकदरांना पडला आहे, त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली आहे.


दीड कोटींपर्यंतची फसवणूक 


गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात ७० ते ८० लोकांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ठाण्यातील गडकरी सर्कल येथे असलेल्या गुडवीन ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना १८ ते २० टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेतली. दरम्यान, ठाण्यात सुरु करण्यात आलेले शॉप बंद करून मालक सुनील नायर आणि सुदेश नायर पसार झालेत. पोलिसांनी या दोघांविरोधार कलम ४०६ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील गुंतवणूकदारांची एकूण दीड कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वक्त करण्यात आला आहे.