स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई  :  गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेली पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हिची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी  आज कोर्टात व्यक्त केला. याप्रकरणी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरसह एकनाथ खडसेंचे भाचे राजू पाटील यांनाही अटक करण्यात आलीय.  


15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळंबोलीमधील  रोडपाली येथून बेपत्ता झालेल्या अश्विनी बिंद्रे प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला गुरुवारी अटक करण्यात आलीय... त्यापाठोपाठ राजकरणात सक्रीय असलेले जळगावचे  ज्ञानेश्वर पाटील उर्फ राजू पाटील यालाही पोलिसांनी अटक केलीय. त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश पनवेल कोर्टानं दिलेत. राजू पाटील हा भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्याची चौकशी करत होते. मात्र त्यानं पोलिसांना चौकशीत काहीच सहकार्य केलं नाही. 


पोलिसांना संशय 


गेल्या पावणे दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रेचा खून झाला असावा, असा संशय नवी मुंबई पोलिसांनी कोर्टात व्यक्त केलाय. गेल्या 11 एप्रिलला राजू पाटील, अभय कुरूंदकर आणि अश्विनी बिंद्रे या तिघांचंही लोकेशन एकच म्हणजे भाईंदर असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यादिवशी कुरुंदकरनं राजू पाटीलला अनेक फोन केले होते. अंधेरीला असलेला राजू पाटील दीड तासात भाईंदरला कुरुंदकरच्या घरी पोहोचला. पण त्याठिकाणी तो केवळ 15 मिनिटंच थांबला. तो तिथं का गेला होता, याचं समाधानकारक उत्तर तो पोलिसांना देऊ शकला नाही. त्यामुळंच याचदिवशी काहीतरी घातपात झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.


राजू पाटील कुरुंदकरच्या घरी गेला तेव्हा अश्विनीचा मोबाईल फोन सुरू होता. मात्र त्यानंतर अश्विनीचा फोन बंद झाला, तो अजूनही बंद आहे. त्यामुळं पोलिसांचा राजू पाटीलवर संशय आहे. परंतु तिघांचे लोकेशन  एकच आहे, एवढ्या संशयावरून राजू पाटीलला अटक करणं चुकीचं असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.


अश्विनी बिंद्रेचा घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनीच व्यक्त केल्यानं या प्रकरणातलं गांभीर्य वाढलंय. त्यातच अभय कुरुंदकरनं आपल्या घरचा रंग देखील बदलल्यानं संशय आणखी बळावलाय.