आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
कोल्हापूर : आजच्या किणी टोलनाक्यावरील स्वाभिमानीने दूध आंदोलनाबाबत पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री २ वाजता वडगाव पोलिसांनी वैभव कांबळे, शिवाजी माने, संपत पोवार, शिवाजी शिंदे, मनोहर देसाई यांना ताब्यात घेऊन पोलस ठाण्यात ठेवलं आहे.
बुलडाण्यात दूध दरवाढ आंदोलन चिघळले आहे. नागपूर- बुलडाणा एसटी बसची वरवंड फाट्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. बुलडाणा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सरकारच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यात मुंबईत मध्यरात्री दुध आंदोलनासंदर्भात बैठक झाली. पण या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय पुढे आलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध बंदीचं आंदोलन सुरुच ठेवणार आहेत.
शेट्टींनी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलन शांतीपूर्ण मार्गानं करण्याचं आवाहनही शेट्टीनी बैठकीनंतर केलंय. मध्यरात्री अंधेरीतल्या नंदगिरी अतिथीगृहात दोन तास चर्चा झाली. पण त्यातून कुठलाही ठोस निर्णय पुढे आलेला नाही. आज मुख्यमंत्री दूध उत्पादकांशी बोलतील आणि त्यातून तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज होणाऱ्या चक्का जाम आंदोलनावर शेट्टी ठाम असून आजचे आंदोलन हे शांततेत पार पाडण्याचे आवाहन शेट्टींनी केलं आहे. जोवर ठोस उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहाणार असल्याचंही शेट्टींनी म्हटलं आहे.