अंधश्रद्धा पसरवणारा मौलवी महिनाभरानंतरही मोकाटच, कारवाईसाठी टाळाटाळ
अंधश्रद्धेचा उघड प्रसार करणारा हा मौलवीं मात्र अजूनही मोकाट आहे
औरंगाबाद : १८ सप्टेंबर २०१८ ला औरंगाबाद जवळच्या खुलताबादच्या मौलाविचा पर्दाफाश 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. अमुक झाडाचं फळ खाल्लं की मुलगा वा मुलगी होतो, असा त्याचा दावा होता. हा सगळा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यावरही औरंगाबाद ग्रामीण पोलीस मात्र यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ होतेय. महाराष्ट्र अंनिसकडून याबाबत पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदनसुद्धा देऊन झालंय. मात्र पोलीस अजूनही याबाबत कारवाई करत नाहीत.
संबंधित खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक 'याबाबत आमच्याकडे कुठलीही तक्रार आली नाही आणि तुम्हीच कायद्याचा अभ्यास करावा, वारंवार आम्हाला विचारू नये' अशा पद्धतीची भाषा माध्यम प्रतिनिधींशी बोलताना वापरत आहेत.
खरं तर कायद्यानुसार हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकारची शहानिशा करून गुन्हा दाखल करायला वा किमान चौकशी करणे गरजेचे होते.
मात्र, दुर्दैवाने पोलीस फक्त तक्रार आली नाही, निवेदन मिळालं नाही अशा आशयाची भाषा करत आहेत... आणि यात अंधश्रद्धेचा उघड प्रसार करणारा हा मौलवीं मात्र अजूनही मोकाट आहे.