DCM Ajit Pawar Security Rise: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र, अजित पवारांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य गृह विभागाच्या सूचनेनंतर यात्रेदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार आज जनसन्मान यात्रेसाठी जळगाव, धुळे आणि मालेगाव येथे दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागामार्फत अजित पवारांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आहेत. तसंच, पवारांच्या सुरक्षेत मोठी वाढदेखील करण्यात आली आहे. 


अजित पवारांना काळजी घेण्याच्या सूचना आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रियादेखील दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत दौरा आम्ही करणारच ना. पोलिसांचे काम आहे सुरक्षा देणे तिथे काही चुकीचं घडू नये याकडे लक्ष देणे, ते याची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. 


अजित पवार आज जनसन्मान यात्रेसाठी धुळे येथे आहेत. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ताफ्यात 50 पोलीस अधिकारी आणि 250 पोलीस कर्मचारी दौऱ्या दरम्यान बंदोबस्त करणार आहेत. तसंच, या जनसन्मान यात्रेवेळी पवार वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत. तसंच, मेळावादेखील घेणार आहेत. अजित पवारांच्या मेळाव्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खरबदारी घेण्यात येणार आहे. 


अजित पवार यांनी घेतली माजी आमदार आसिफ शेख यांची भेट


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार आसिफ शेख यांची मालेगावी भेट घेतली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीला ( शरद पवार गट ) सोडचिठ्ठी दिल्याने भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. आसिफ शेख हे मालेगाव मध्यमधून अपक्ष उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आसिफ शेख हे अजित पवारांच्या गळाला लागतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर आसिफ शेख यांची सांत्वनपर भेट घेतली असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.