विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड; पळून जात असताना तरुणाचा मृत्यू
विरारमध्ये अत्यंत विचित्र घटना घडली आहे. पत्त्यांच्या डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Virar News: राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशातच विरारमध्ये एका गणेशोत्सव मंडळावर पोलिसांंनी छापेमारी केली. मंडपात पत्त्यांचा डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही धाड टाकण्यात आली. यावेळी पळून जाताना 19 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
विरारच्या आगाशी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचित भोईर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे आगाशी गावावर शोककळा पसरली आहे. तसेच येथील गणशोत्सवावर दुख:चं सावट पसरलं आहे.
काय झालं नेमकं?
आगाशी जवळील कोल्हापूर येथील गणेशोत्सव मंडपात काही तरूण मुले जागरण करत पत्ते खेळत होती. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्नाळा पोलिसांचे गस्तीवरील वाहन छापा टाकण्यासाठी आले. पोलिसांना पाहून मुलांची पळापळ सुरू झाली. पळत असताना प्रचित विनोद भोईर (१९) हा मुलगा खाली कोसळला. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तरुणाच्या मृत्यूमुळे गावात तणाव
या प्रकारामुळे गावात एकच तणाव निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी संजीवनी रुग्णालयात बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याची गरज नव्हती. पोलिसांनी त्याचवेळी त्याला प्रथमोपचार दिले असते तर जीव वाचला असा आरोप मयत प्रचितच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण
तरुणाला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही. केवळ धावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले. आम्ही मंडपावर छापा घातला नाही. केवळ रात्रीच्या पोलीसांचे गस्तीचे वाहन तेथून जात होते. पोलीस छापा टाकायला आले आणि ते आपल्याला पकडतील या भीतीने मुले पळाली आणि त्यात या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.