Police Raped Sugarcane Cutting Work: बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी उस्मानाबादमधील भूममध्ये एका महिला ऊसतोड मजुरावर अत्याचार झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण कसं समोर आलं यासंदर्भातील सविस्तर तरपशील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"काल भूम जि. उस्मानाबाद येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर 2 पोलिसांनी अत्याचार केलाय. त्यातील 1 आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्याच ओळीत म्हटलं आहे. पुढे या प्रकरणासंदर्भात बोलताना, "पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना 'चोर' असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले," अशी माहिती दिली. 


गोळीबार प्रकराणाचाही संदर्भ...


कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचा संदर्भही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. "(भूममधील) या घटनेवरून राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात," असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. "या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. 'वंचित'चे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले," असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.


फडणवीसांवर हल्लाबोल


प्रकाश आंबेडकरांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होतंय," असंही या पोस्टच्या शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.



प्रकाश आंबेडकरांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.