Maharashtra Karnataka Border : महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशातच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या राजापूर बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  पाणी  चोरीच्या भितीमुळे येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं कारण म्हणजे कर्नाटकातील नागरिक रात्रीच्या वेळी राजापूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याची चोरी करतात. त्यामुळेच पाटबंधारे विभागाकडून ही खबरदारी घेतली आहे...महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकला पाणी देण्यास विरोध आहे.
कर्नाटक राज्यात पाण्याची भीषण टंचाई आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातून कर्नाटकचे लोक पाण्याची चोरी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर राजापूर बंदर आहे. याच बंधाऱ्यातून कर्नाटकचे लोक मध्यरात्री पाण्याची चोरी करत आहेत असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांचा आहे त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने राजापूर बंधाऱ्यावर दिवसा आणि रात्री पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त ठेवला आहे शिवाय पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील चौकीदार म्हणून नेमले आहेत. 
जर, या बंधाऱ्यातून कर्नाटकला पाणी सोडले तर महाराष्ट्रात पाण्याची टंचाई निर्माण होईल... महाराष्ट्रातील या भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कमी पडेल अशी भीती शेतकऱ्यांना आहे.


महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील नागरिकांचा राजापूर बंधाऱ्याच्या पाण्यावरून उद्भवलेला संघर्ष नवीन नाही. 2003 साली या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या नागरिकांमध्ये मध्यरात्री हाणामारी झाली होती.  इतकच नाही तर वाहनांची जाळपोळ देखील झाली होती. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये अशी इच्छा स्थानिकांची आहे.


महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील पाण्यावरून निर्माण झालेला हा संघर्ष धक्कादायक आहे. पाण्याच्या प्रश्नावरून तिसरं महायुद्ध होईल असं भाकीत केलं जातं. त्या दिशेने तर आपण जात नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.