सर्फराज मुसा, झी मीडिया, सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले (Prashant Damle) यांना रविवारी सांगली (Sangli) जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना अभिनेते प्रशांत दामले यांनी राजकारण्यांना खोचक टोला लगावला आहे. राजकारणी ही आमच्यापेक्षा उत्तम कलाकार आहेत,नाट्य कलाकार तीन तास काम करतो, आणि राजकारणी 24 तास काम करतात, असे प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राजकारण्यांचे आयुष्य आमच्यापेक्षाही खोटं आहे. त्यामुळे त्यांना विचार करताना ब्रेक हवा आहे. त्यांचे आयुष्यभर राजकारण सुरु आहे. पण त्यांनी तीन तास आमचं नाटक बघाव आणि स्वतःचे मत बनवावं. तीन तास अंधारात बसून उजेडात असलेल्या आमच्याकडे तुम्ही बघावं. राजकारणी हे पूर्वीपासून कलाकार आहेत. फक्त पूर्वी आम्हाला दिसायचे आता दिसत नाहीत. आताच्या राजकारण्यांना वेळ मिळत नाही कारण त्यांच्या नाटकाचे प्रयोग खूप लागलेले आहेत," असा खोचक टोला प्रशांत दामले यांनी लगावला.


"राजकारणी ही आमच्यापेक्षा उत्तम कलाकार आहेत,नाट्य कलाकार तीन तास काम करतो, आणि राजकारणी 24 तास काम करतात. आम्ही तीन तास काम करतो आणि ते 24 तास नाटक करतात असं म्हणत नाहीये. ते काम करत असतात. राजकारण करणं हे अवघड काम आहे. त्या त्या ठिकाणी त्यावेळी तो चेहरा घेऊन जाणे. लग्नात, अंत्यदर्शनाला आणि सभेला वेगवेगळे चेहरे घेऊन फिरत असतात. 24 तास जनतेसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे राजकारण्यांना मी सलाम करतो," असे प्रशांत दामले म्हणाले.


"मराठी रंगभूमीसाठी चांगली नाट्यगृहे उपलब्ध करुन देणे हे शासनाचे काम आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे चारही नेते नाट्यवेडे आहेत. त्यांच्यासोबतचे अधिकाऱ्यांनाही नाटकाची आवड आहे. पुढच्या चार ते सहा महिन्यांत सकारात्मक गोष्टी पाहायला मिळतील. दुसरी बाजू आमची आहे. नाटक म्हटल्यावर हे सांघिक काम आहे. त्यामुळे सगळ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडायला हवी. त्यांना उत्तर द्यावं लागतं त्यामुळे चांगले काम करावं लागतं. प्रेक्षकांनी ठरवायचं असतं नाटकं बघायचे की नाही. चांगले की वाईट हे प्रेक्षकांचे काम आहे. पण नाटकांची पाऊणे दोनशे वर्षांची परंपरा सशक्तपणे पुढे घेऊन जाण्यासाठी उत्तम नाट्यगृह उभारुन पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे,त्यासाठी सरकारने आणि कलाकार मंडळी आपली बाजू सांभाळणे गरजेचे आहे,"असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले आहे.