वसंत गीते भुजबळांच्या भेटीला
राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा
नाशिक : राज्याच्या राजकारणात अतिशय मोठ्या प्रमाणात फेरबदल आणि मोठ्या घडामोडी घडत असतानाच नाशिमध्ये भाजपला एक धक्का मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. अशा प्रकारच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे, त्यामागचं कारणंही तसंच आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून डावलण्यात आलेले वसंत गीते हे सोमवारी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्या भेटीला गेले होते.
गीते आणि भुजबळ यांच्यातील ही भेट बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली. ज्यामध्ये ते येत्या काळात राष्ट्रवादीतही जाण्याच्या चर्चांनी ड़ोकं वर काढलं. स्थानिक ओबीसी नेते म्हणून गीते यांची ओळख आहे. शिवाय त्यांचं स्थानिक पातळीवरील काम आणि पक्षाकडून त्यांच्यासारख्या नेत्याकडे झालेलं दुर्लक्ष पाहता स्थानिकांमध्येही एक खदखद होती.
विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारीच्या या गणितांमधून भाजपकडून काही महत्त्वाच्या आणि तितक्याच प्रतिष्ठित नेत्यांना डावलण्यात आलं. ज्यामुळे सध्याच्या घडीला पक्षातही तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, दिलीप कांबळे आणि प्रकाश मेहता यांनादेखील भाजपकडून दुर्लक्षित ठेवण्यात आलं. परिणामी पक्षातीत बडे नेते हे बंडखोरीचा पवित्रा आपलासा करण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. इतकच नव्हे तर काही नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर आता कोणत्या पक्षात इनकमिंग आणि आऊटगोईंग होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.