देवेंद्र कोल्हटकर, झी मिडिया, मुंबई : मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासोबतच आता व्यापक आरोग्य हित लक्षात घेता, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 


या निर्देशांना अनुसरुन, नागरी वस्‍तीत सोने चांदी वितळवणा-या भट्टींवर (गलाई व्‍यवसाय)  महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. काल (दिनांक ६ नोव्‍हेंबर २०२३) सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱया अर्थात गलाई व्‍यावसायिकांचे एकूण ४ धुराडे (चिमणी) निष्‍कासित करण्‍यात आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे. 


सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारा वायू चिमणी/ धुराडे याद्वारे हवेत सोडला जातो. शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱया गलाई व्‍यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत चार भट्टी, धुराडे यांचे निष्‍कासन करण्यात आले.


दिवाळीपूर्वीच यंदा नागरिकांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावतायत. वायू प्रदूषणामुळे खोकला, घशातील खवखव, श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा वापर करावा अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्यात. प्रदूषणाच्या गुणवत्तेचा स्तर इतका वाईट आहे की त्याने धोकादायक पातळी गाठलीय त्यापासून संरक्षणासाठी रुमाल किंवा स्कार्फ निरुपयोगी ठरत असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलंय. लहान मुलं, वृद्ध, गरोदर स्त्रिया तसंच रस्त्यावर काम करणा-यांनी विशेष काळजी घ्यावी असंही आरोग्य विभागाने म्हटलंय.