पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : तर `त्या` ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा?
टिकटॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं.
बीड : पूजा चव्हाण नावाच्या टिक टॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक पहिल्यांदाच मीडियासमोर आले. आमच्या मुलीची बदनामी थांबवा, अशी कळकळीची विनंती पूजाच्या वडिलांनी केलीय. तर कथित ऑडिओ क्लिपमधला आवाज अरुण राठोडचा नाही, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सध्या तमाम महाराष्ट्राला हेच प्रश्न पडले आहेत. बीडमधल्या पूजा चव्हाण या टिकटॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी आरोप केले आहेत. मात्र मृत्यूनंतर आठवडाभरानंतर पूजाचे वडील पहिल्यांदाच समोर आले. पोल्ट्री व्यवसायातील नुकसानीमुळं पूजानं आत्महत्या केली असावी, असं ते सांगत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या क्लिपमधला आवाज पूजाचा नाही, असा दावाही त्यांनी केलाय.
पूजाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 ऑडिओ क्लिप्स समोर आल्या. त्यात अरुण राठोड नावाच्या पूजाच्या मित्राचाही आवाज असल्याचं समोर आलं होतं. मात्र तो आवाज अरुण राठोडचा नाही, असा दावा अरुणच्या कुटुंबीयांनी देखील केला आहे.
मग त्या ऑडिओ क्लिपमधले आवाज नेमके कुणाचे आहेत? असा सवाल उपस्थित होतो. या ऑडिओ क्लिप कोण आणि का व्हायरल करतंय? याची उत्तरं देखील पूजाच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना शोधावी लागणार आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांवर कसलाही दबाव नसल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी बंजारा समाजानंही आक्रमक भूमिका घेतलीय. पूजाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली जाते आहे. केवळ पूजाचीच नव्हे, तर तमाम बंजारा समाजाची बदनामी होतेय, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या प्रकरणातलं सत्य लवकरात लवकर समोर यावं, हीच सगळ्यांची इच्छा आहे.