पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दुवा गायब
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती 24 तासांपासून गायब
पुणे: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. आरोप-प्रत्यारोप झाले संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचे पडसादही विधिमंडळात उठल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुरावे असलेला पूजाचा लॅपटॉप भाजपच्या नगरसेवकाकडे असल्याचा आरोप झाला होता. त्या आरोपानंतर आता भाजपचा स्थानिक नगरसेवक गायब झाल्याचं सांगितलं जात आहे. या नगरसेवकाचा 24 तासांपासून पत्ताच नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बुधवारपासून भाजपचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे घरी आले नसल्याचं त्यांच्या वडिलांनी माहिती दिली. तर माझ्या मुलाची बदनामी या प्रकरणात केली जात आहे. त्याने कोणताही लॅपटॉप चोरला नाही अशी माहिती धनराज घोगरे यांचे वडील बाबुराव घोगरे यांनी दिली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी बीड मध्ये आणखीन एक तक्रार देण्यात आली. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडीचे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी पीडित पूजा चव्हाणसह बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण-राठोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
धनराज यांच्यावर बंजारा समाजाची बदनामी, लॅपटॉप चोरीचा आरोप आहे. बुधवारपासून त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे गेले? गायब झाले की गायब करण्यात आलं? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. एक एक दुवा गायब होत असल्यानं पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाभोवती संशयाचं वलय अधिक गडद होत असल्याचं दिसत आहे.