Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या नावात विसंगती दिसून येत आहे. 2019 ला त्यांनी यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) दिली होती. त्यावेळी यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावानं सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग DEELIPRAO असं लिहिण्यात आलंय. तर 2021 च्या यादीत नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी मनोरमा आईचं नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाचं स्पेलिंग DILIP हे सरळ लिहिण्यात आलंय. आता नावातील हे बदल का करण्यात आले? ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजे ऍफिडेविट किंवा कोर्ट ऑर्डर आहे का? असे प्रश्न उपस्थित झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार
पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राचीही चौकशी होणाराय. दिव्यांग आयुक्तांनी पुणे पोलिसांना (Pune Police) पत्र पाठवलंय. याबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवलाय. पूजा खेडकर यांना अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. ते प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय समितीतील सदस्यांचेही खुलासे मागवण्यात आले आहेत. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेयत.


पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं. विशेष म्हणजे अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालय तसंच पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय अशा दोन ठिकाणहून त्यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवली होती. पुणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून देखील त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देता येणार नाही असं जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्टपणे कळवण्यात आलं. युपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यासाठी दिल्लीतील एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करवून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करवून घेतली नाही


या रुग्णालयाकडून दिव्यांग प्रमाणपत्र
पूजा खेडकरांना पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर आल्यानंतर त्यावरून नवीन वाद निर्माण झालाय. पूजा खेडकरांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड दिलंय. वास्तविक पाहता दिव्यांग प्रमाणपत्राला ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड चालत नाही. एवढंच नाही तर पूजा खेडकरांनी वायसीएम रुग्णालयात रहिवासी पत्ता एका खाजगी कंपनीचा दिलाय. आणि याच खाजगी कंपनीची गाडी खेडकर वापरत होत्या. त्याचमुळे वायसीएम रुग्णालयाच्या संबंधित अधिकारी कर्मचा-यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीय. 


चौकशीतून सत्य समोर येईल
दरम्यान, चौकशीतून सत्य सर्वांसमोर येईल असं वादग्रस्त प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकरांनी म्हटलंय.  दररोज चुकीची माहिती पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच पोलिसांना आपणच बोलवलं असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. वैयक्तिक कामासाठी पोलिसांना बोलावल्याचं त्यांनी म्हटलंय.