Viral Video :  जालना जिल्ह्यात रस्त्याच्या कामातल्या भ्रष्टाचाराचा वेगळाच नमुना पाहायला मिळाला आहे.  सहज हाताने गुंडाळता असा निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या  व्हायरल व्हीडिओने भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोखरी-कर्जत रस्त्याचं काम सुरु आहे. मात्र, हे काम एवढं बोगस आहे की हा डांबरी रस्ता स्थानिकांनी हातानेच गुंडाळला. डांबरीकरण होत असलेल्या या रस्त्याखाली कारपेट आढळल आहे. स्थानिकांना कारपेटसोबत रस्ताही उचलून दाखवत असलेला व्हीडिओ व्हायरल झाला आहे. 


झी २४ तासने दाखवलेल्या या बातमीची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील घेतली. तसंच भ्रष्टाचाराच्या कामावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय. या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करायची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


जितेंद्र आव्हाड यांनी काय टीका केली?


महाराष्ट्र सरकारने 'भ्रष्टाचारी तंत्रज्ञानात' अल्पावधित मोठी प्रगती केली आहे. सत्ता आल्यानंतर अवघ्या 10 महिन्यात जगात पहिल्यांदा 'फोल्डिंगचे रस्ते' बनवण्याचं तंत्रज्ञान यांनी विकसित केलं आहे. हे असंच चालू राहिलं तर काही दिवसातच आपल्याला घडी घालून ठेवायचे रस्ते देखील पाहायला मिळतील,असा मला विश्वास आहे असा टोला आव्हाड यांनी लगावला. 


नुस्त्या हातानंही रस्ता उखडतोय


रस्तेबांधणीत कसा भ्रष्टाचार होतोय याचं धक्कादायक वास्तव पुण्यातल्या शिरुरमध्ये उघड झाल आहे. जातेगावात चाकण- शिक्रापूर जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. दोन किलोमीटरचा हा रस्ता एवढा निकृष्ट पद्धतीनं बांधण्यात आलाय की नुस्त्या हातानंही हा रस्ता उखडतोय.. महिनाभरापूर्वीच हा रस्ता बांधण्यात आला होता. यासाठी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. 


खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या सूचना


ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली...आणि ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे 1 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.


भुमिगत गटार योजनेचे कामे निकृष्ट दर्जाचे


भंडारा शहरात भुमिगत गटार योजनेचे कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचं आढळून आले आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदुन त्यात माती टाकल्यामुळे, त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होतोय. शिवाय भूमिगत गटार योजनेत वापरत असलेले पाइप छोटे आहेत. वाढते शहरीकरण लक्षात घेता भविष्यात यातून सांडपाणी वाहून नेणं शक्य होणार नाही. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.