ठाणे: शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलंय. त्यामुळे ठाणेकर हैराण झालेत. आता ठाणेकरांच्या मनःस्तापात आणखी वाढ झालीय. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ठाणेकरांना फसवण्याचं काम पालिकेकडून सुरु असल्याचे समोर आलंय. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याऐवजी तोंडदेखली कारवाई करण्यात येत आहे. चार कामगारांना पाठवून खड्ड्यांमध्ये रेती आणि दगड भरले जातात. मात्र पावसामुळे हीच रेती आणि दगडं पुन्हा वर येऊन या ठिकाणी मोठा खड्डा पडतो. ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात अशाप्रकारे खड्डे बुजवण्याच्या कामाखाली पालिकेकडून नागरिकांची फसवणूक सुरु असल्याचं समोर आलंय.


श्रीरंग आणि वृंदावन परिसरात मोठमोठाले खड्डे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील श्रीरंग आणि वृंदावन परिसरात मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. श्रीरंग परिसरात शाळा आणि खासगी शिकवणी असल्याने इथं दुपारच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी होते. लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केलीय.


आमदार जितेद्र आव्हाडांची वेगळी मागणी


कळव्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात येत असलेला तिसरा उड्डाणपूल हा शिवाजी हॉस्पिटल या ठिकाणी न उतरवता नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या पटनी मैदानाजवळ उतरवण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. हा पूल शिवाजी हॉस्पिटल या ठिकाणी उतरवला गेल्यास नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असून पुलाचा खर्च देखील वाया जाणार आहे. यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेने मिळून अर्थसहाय्य  करावे अशी सूचना त्यांनी केलीये.. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे.