शशिकांत पाटील, प्रतिनिधी, झी मिडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला. तर ३० जण जखमी झाले. हा अपघात  महामार्गावर असलेल्या खड्डयांमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणाची फार मोठी किंमत प्रवाशांना भोगावी लागलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे नाही तर लातूर निलंगा महामार्गावरील खड्डयांमुळेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात पुढे आले आहे. लातूर निलंगा दुपदरी महामार्गावरील चलबुर्गा पाटी जवळील खड्डा चुकविण्यासाठी लातूरहून निलंगाकडे निघालेल्या एसटी चालकाने आपली बस वळविली आणि पुढून भरधाव वेगात लातूरकडे येणाऱ्या अवजड ट्रक सोबत समोरासमोर धडक झाली. खड्डे असलेल्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आणखी किती प्रवाशांना असे अपघातात जीव द्यावा लागेल असा सवाल उपस्थित केला जातोय.


चलबुर्गा पाटी जवळून काही अंतरावर असलेल्या या अपघातस्थळी यापूर्वीही अपघात झाले आहेत मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे नागरिक सांगत आहेत. पोलिसांनी अद्याप अपघाताचे कारण स्पष्ट केलं नसलं तरी घटनास्थळाचा वस्तुस्थितीवरून सारे काही स्पष्ट होत आहे. घटनास्थळी आलेले भाजप नेते मात्र खड्डे मुक्त महामार्ग होतील असा दावा करीत आहेत.


लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदारसंघाकडे जाणाऱ्या बसचा खड्ड्यांमुळे अपघात झाला. त्यानंतर स्वतः पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळावर भेटही दिली. मात्र आता लातूर जिल्ह्यातील पर्यायाने महाराष्ट्रातील महामार्ग खड्डे कधी होतील असा सवाल आता वाहनधारक तसेच नागरिक यावेळी विचारत होते.