मुंबईत वीज ठप्प होऊ नये म्हणून उरण येथे प्रकल्प
मुंबईतील वीज ठप्प होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण येथे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याचा फटका रेल्वेलाही बसला होता. आता यापुढे मुंबईतील वीज ठप्प होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण येथे हजार मेगा वाट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
मुंबईतील वीज पूरवठा १२ ऑक्टोबर रोजी ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी उरण येथेच विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर नवा किमान एक हजार मेगावाट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या दोन वर्षांत उभे करण्याच्या सूचना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.
यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. राऊत यांनी अलिकडेच उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. या वेळेस त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली.
मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज २५०० मेगा वाट असते आणि २०३०ला ही गरज ५ हजार मेगावट असेल. तसेच १२ ऑक्टोबरला झालेली वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ १३०० मेगावाट वीज निर्मिती होते. १२ ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने आणि मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान एक हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा पक्रल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.