महाराष्ट्र बंद यशस्वी, प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढली
कोरेगाव - भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दलित समाजाचा मोठा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरेगाव - भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दलित समाजाचा मोठा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या घोषणा
ज्या-ज्या ठिकाणी काल दलित समाजाने आंदोलन, रास्तारोको केला त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार्या घोषणा दिल्या जात होत्या. कोरेगाव - भीमा घटनेमुळे दलित समाजात प्रचंड अस्वस्थता आणि राग होता. मात्र याबाबत रामदास आठवले, गवई गट, आनंदराज आंबेडकर अथवा इतर कुठल्याही दलित नेत्याने कोणताही ठोस भूमिका घेतली नाही.
सत्ताधारी भाजपमध्येही अस्वस्थता
त्याचवेळी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊन दलितांच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याने इतर दलित नेत्यांबरोबरच सत्ताधारी भाजपमध्येही अस्वस्थता आहे.
आठवलेंना रोषाचा फटका?
या मोर्चातून दलितांनी सरकारविरोधात राग व्यक्त केला असून रामदास आठवले सरकारबरोबर असल्याने त्यांनाही या रोषाचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने राज्यातील दलित एकगठ्ठा प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभा राहिल्याने आठवले यांच्यासह इतर दलित नेते अस्वस्थ आहेत. यानिमित्ताने आंबेडकरी राजकारण दिशा बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.