Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi : "येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. तोपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर त्यानंतर पुढील दिशा ठरवू. आमची जी काही भूमिका असेल ती सर्वांसमोर जाहीर करु", असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीसोबत युती करण्याबद्दलही भाष्य केले. 


प्रकाश शेंडगेंसोबत दीड तास चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाविकासआघाडीच्या तिढ्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही त्याबद्दल त्यांनाच विचारा. प्रकाश शेंडगे यांनी एक नवीन पक्षाची नोंदणी केली आहे. त्यांनी एक यादी आमच्याकडे दिली आणि त्यावेळी युतीबद्दल चर्चा केली. यावेळी मी त्यांना आमचंच घोंगड महाविकासआघाडी सोबत भिजत पडलेला आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही काहीही बोलू शकत नाही किंवा यावर अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. आमची दीड तास चर्चा झाली. त्यात कोणकोणते मतदारसंघ मागत आहे, का मागतात याची माहिती घेतली", असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


"तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असतं तर घोंगड भिजत पडलं नसतं. तुम्ही आम्हाला टार्गेट केलं म्हणून त्यांना त्यांच कोंबड झाकता आलं. त्यांच कोंबड आता बांग देऊ लागलय. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 10 जागांवरुन वाद आहे. तर 5 जागांवरुन तिन्ही पक्षांमध्ये टाय आहे. त्यामुळे जर त्यांचाच तिढा सुटत नसेल तर आम्ही त्याच्यात कुठे शिरायचं. आजही त्यांचा तिढा सुटला, याबद्दल काही संवाद झालेला नाही. जर त्यांचाच तिढा सुटणार नसेल तर आम्ही एंट्री करुन काय उपयोग?" असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. 


26 मार्चपर्यंत वाट पाहू, त्यानंतर भूमिका जाहीर करु


"यावेळी त्यांनी आम्ही 26 मार्च पर्यंत वाट पाहू, त्यानंतर आमची जी काही भूमिका असेल ती आम्ही सर्वांसमोर मांडू. तसेच त्यानंतर पुढील दिशा ठरवू. यातील एक भूमिका म्हणजे आम्ही काँग्रेसला चॉईस दिली आहे. जर त्यांचा जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा लढवाव्या लागतील. त्यात काँग्रेस 48 जागा लढत असेल तर आम्ही सात जागांना पाठिंबा देऊ", अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.


प्रकाश आंबेडकरांकडून छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीला पाठिंबा


तसेच महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हा निर्णय तिन्ही पक्षांकडून घेण्यात आला आहे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं ते यावेळी घडू द्यायचे नाही, याची दक्षता घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचे नाव घोषित करण्यात आले. त्याबद्दल आम्ही पाठिंबा दिला आहे, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.