Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment:  राज्याचे गृहमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात महत्त्वाचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस सध्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं नव्हतं. सुरत लुटल्याचा खोटा इतिहास काँग्रेसने आपल्याला शिकवला, असं विधान फडणवीस यांनी रविवारी प्रसारमाध्यमांसमोर केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्त संजय राऊत यांच्याबरोबरच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनाही या वक्तव्यावरुन थेट भाजपा आणि भाजपाची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. 


...पण ते माफी मागणार नाहीत हे मला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी लातूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांच्या विधानावर भाष्य केलं. भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागवी, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला तसेच मनुस्मृतीला आव्हान उभे केले. त्यामुळेच कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. शिवाजी महाराजांनी आलुतेदार आणि बलुतेदारांमधून सैन्य उभं केलं. याचं शल्य भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आजही आहे. मी फडणवीस यांच्या विधानाचा निषेध करतो," असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. "भाजपा आणि आरएसएसने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी महाराजांची माफी मागायला हवी. मात्र ते माफी मागणार नाहीत, हे मला ठाऊक आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


फडणवीस शिवरायांचा इतिहास बदलू पाहत आहेत; ठाकरेंच्या सेनेचा टोला


"मालवणात शिवरायांच्या पुतळ्याची मोडतोड केली त्याप्रमाणे इतिहासाचीही मोडतोड करण्याची सुपारी फडणवीसांनी घेतली आहे व महाराष्ट्रासाठी हे घातक आहे. फडणवीस हे सध्या गुजरातचे राजकारणी व व्यापार मंडळाचे मिंधे झाले आहेत. महाराजांनी सुरत लुटली ही जखम आजही भळभळत असल्याने सुरतच्या बदल्यात मुंबई लुटण्याचे काम मोदी-शहांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सुरत महाराजांनी लुटली असा इतिहास गुजरातच्या व्यापार मंडळास मान्य नाही. त्यामुळे फडणवीस शिवरायांचा इतिहास बदलू पाहत आहेत. फडणवीस यांना पेशव्यांचा, स्वतःच्या पक्षाचा, स्वातंत्र्य लढ्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या इंग्रजधार्जिण्या धोरणांचा इतिहास माहीत नाही तेथे शिवरायांच्या जीवन चरित्राचे पैलू त्यांना कसे माहीत असतील?" असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.


महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून...


"आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले. सुरतमध्ये तेव्हा इंग्रजांच्या वखारी होत्या. सुरतमध्ये पोर्तुगीजांचीही वळवळ सुरू होती. या सगळ्यांकडे अफाट संपत्ती होती व मोगलांना त्यातील मोठा वाटा मिळत होता. मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे. "म.म. फडणवीस यांना शिवरायांचे शौर्य मान्य नसावे, हे पहिले किंवा सुरत महाराष्ट्राच्या राजाने लुटली ही जखम सध्याच्या गुजराती व्यापार मंडळास अस्वस्थ करीत असेल. त्यामुळे सुरत लुटीशी शिवरायांचा संबंध नसल्याची बतावणी म.म. देवेंद्र फडणवीस यांनी केली असावी, हे दुसरे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व महाराष्ट्राच्या निर्मितीत शून्य योगदान असलेल्यांची ही पिलावळ आहे. यांनी देश लुटला ते चालते, पण महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी सुरत लुटली हा इतिहास ते बदलायला निघाले आहेत," असा टोला फडणवीस यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे.