COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जींना आमंत्रण दिल्यानं राजकारण सुरू झालं आहे.  मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाऊ नये, असा सूर काँग्रेसमध्ये आहे  तर मुखर्जींना बोलावण्यात गैर ते काय, असा सवाल संघानं केला आहे.


संघाच्या कार्यक्रमात हे चेहरे नवे नाहीत. पण संघाच्या कार्यक्रमात एक नवा चेहरा दिसणार म्हणून देशात बरीच चर्चा सुरू झाली आहे. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे हे पाहुणे आहेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते प्रणव मुखर्जी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप नागपुरातल्या रेशीमबाग मैदानावर 7 जूनला होणार आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रमणव मुखर्जींना संघानं निमंत्रण दिलं आणि मुखर्जींनी ते स्वीकारलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह प्रणव मुखर्जी संघ स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत.


काँग्रेसनं संघाला नेहमीच कडाडून विरोध केलाय.त्यामुळेच मुखर्जींनी संघाच्या व्यासपीठावर येण्याचं निमंत्रण स्वीकारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्याय आहेत. मुखर्जींनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असा सूर काँग्रेसमध्ये आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नेहमीच समाजातल्या प्रतिष्ठितनागरिकांना संघाच्या कार्यक्रमात बोलावलं आहे, ज्यांना संघ समजतो, त्यांच्यासाठी हे नवं मुळीच नाही. यावेळी आम्ही प्रणव मुखर्जींना बोलावलं आहे.  त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं हे त्यांचं मोठेपण असल्याची प्रतिक्रिया संघानं दिली आहे.


दुसरीकडे माजी राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जींना संघाच्या कार्यक्रमात बोलावण्यात गैर काय, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. याहीआधी संघाच्या कार्यक्रमात महात्मा गांधीजी, डॉ. झाकिर हुसेन, बाबू जयप्रकाश नारायण, जनरल करिअप्पा यांनीही उपस्थिती लावली होती. आता प्रणव मुखर्जींना दिलेल्या आमंत्रणामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकारणासाठी एक नवा मुद्दा सगळ्यांनाच मिळाला आहे.