मुंबई : उन्हाचा दाह वाढत असतानाच आखेर पावसाच्या सरींचा राज्यातील काही भागांवर शिडकावा झाला. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पण अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे त्याच्या पुढच्या प्रवासात अडथळे येत आहेत. असं असलं तरीही मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 
वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडासह हा पाऊस झाला. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून पडली आहे. तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. काही ठिकाणचा वीज पुरवठा आणि दुरध्वनी सेवा देखील खंडित झाली होती. अहमदनगरमध्ये दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने जवळपास दोन तास बॅटींग केली. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. तर, रत्नागिरी जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. 


मुंबई आणि उपनगरातही दमदार हजेरी.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, माहीम, माटुंगा, मालाड परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. कांदिवली, बोरीवली, दहिसर तसंच पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी परिसरातही विजेचा कडकटाड आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली, ठाण्यातील भाजी मार्केटमध्येही पाणी भरलं. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं पाहायला मिळालं. या पावसामुळे मुंबईच्या लोकल वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.. पहिल्याच पावसाचा फटका हवाई वाहतुकीवरही झाला. कमी दृष्यमान असल्याने मुंबई विमानतळावरील वाहतूक बंद झाली होती. 


शॉक लागून दोन मुलांचा मृत्यू 


सोमवारी मुंबई आणि उपनगरात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला. मात्र मुंबईतल्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या ओझा आणि तिवारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  कारण या कुटुंबातील व्यक्तींचा शॉक लागून मृत्यू झाला. तुषार झा आणि रिषभ तिवारी अशी मृत मुलांची नावं आहेत. पाऊस पडल्यामुळे ते दोघंही खेळण्यासाठी म्हणून गेले होते. पाणी साचलं होतं, त्यांच्या घराबाहेर एक शिडी लावण्यात आली होती. त्याच्या शेजारुन गेलेल्या वीजेची तार गेली होती. त्या तारेतील विद्युत प्रवाह शिडीत उतरला होता ज्याला हात लागताच दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. 


दोन चिमुरड्यांचा मृत्यू 


जुन्नर तालुक्यात सोमवारी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. तालुक्यातील ओतूर जवळच्या आदिवासी भागातील डोमेवाडी तेलदरा याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे एका घराची भिंत कोसळलीय. यात दोन चिमुरड्यांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झालाय. तर एक वृद्ध महिला जखमी झाल्याचं कळत आहे. वैष्णवी भुतांबरे आणि कार्तिक केदार अशी मृत पावलेल्या मुलांची नावं आहेत. तर चिमणाबाई केदार असं जखमी वृद्धेचं नाव आहे. सध्या चिमणाबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.