सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी हवेचा जोर जास्त असल्याने काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या सिंधुदुर्गवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, येत्या ४८ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने बुधवारी वर्तविला होता. मान्सूनचे आगमन आणखी दोन दिवसांनी लांबल्यामुळे अनेकांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, आता मान्सूनच्या भारतातील निर्धोक वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तापमान वाढल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास मदत होत आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर मान्सूनच्या वाटचालीस मदत होते. त्यामुळे श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून आता भारताची वेस ओलांडण्यासाठी काही तास उरले आहेत.


दरम्यान, मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर १८ ते २० तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. तर केरळमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये उत्तर आणि दक्षिण ओडिशातील वेगळ्या ठिकाणी वादळ येईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक एच.आर. विश्वास यांनी दिली होती. 


तर देशातील इतर भागांचा विचार करता गोव्यात १२ जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल. आंध्र प्रदेशच्‍या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. केरळमध्‍ये दरवर्षी १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून ६ तारखेला येण्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली होती. मात्र, आता मान्सूनचे आगमन आणखीनच लांबणीवर पडले आहे.