८५ दिवस कोमात असलेल्या महिलेची प्रसुती
तीन महिन्याची गरोदर असताना ती कोमामध्ये गेली.
अश्विनी पवार, प्रतिनिधी, झी मीडिया, पुणे : तीन महिन्याची गरोदर असताना ती कोमामध्ये गेली. मात्र तब्बल ८५ दिवस कोमामध्ये राहिल्यानंतरही तिनं निरोगी बाळाला जन्म दिला. पुण्यातील डॉक्टर्सच्या अथक प्रयत्नांमुळे तिचा आणि तिच्या चिमुरडीचाही जीव वाचला.
दीड महिन्याची हरमंदिर रुबी हॉलमधील सर्वच डॉक्टर्सच्या ओळखीची झाली आहे. कारण तिचा जगात येण्याचा संघर्षच आश्चर्यचकीत करणारा आहे. या संघर्षात तिला डॉक्टर्सचीही साथ मिळाली.
हरमंदिर गर्भात असतानाच तिची आई प्रगती साधवाणी कोमामध्ये गेली होती. आठ वर्षांपासून डायबेटीस असलेल्या प्रगतीला पुण्यातील रुबी हॉलमध्ये भरती केलं तेव्हा डॉक्टर्सनी तिच्या आजाराचं हायपोग्लायसेमिक कोमा हे निदान केलं. या परिस्थितीमध्ये तिला वाचवण्यापेक्षा अवघड होतं ते तिच्या पोटातील बाळाला वाचवणं. मात्र हे आव्हान रुबी हॉल मधील डॉक्टर्सनी स्वीकारलं.
तब्बल ८५ दिवस प्रगती कोमामध्ये होती. तिच्या या परिस्थितीमुळे बाळाला कोणताही अपाय होऊ नये आणि गर्भाची व्यावस्थित वाढ व्हावी याची पूर्ण काळजी डॉक्टर्सनं घेतली.
कोमामधून बाहेर आल्यानंतर काही दिवसातचं प्रगतीने हरमंदिरला जन्म दिला आणि डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश आलं आणि प्रगतीला नव्या आयुष्यासोबतच निरोगी बाळही मिळालं. डॉ. तांदुळवाडकर आणि त्यांच्या सहका-यांचं त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून कौतुक केलय.
प्रगतीवर उपचार करत असतानाच तिच्या बाळाला जगात आणण्यासाठी डॉक्टर्सनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे प्रगतीबरोबरच हे डॉक्टर्सही हरमंदिरचे खरे जन्मदाते आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.