नवी मुंबई: अविवाहित असतानाच गरोदर, सत्य लपवलं; बाथरुममध्ये प्रसूती करताना तरुणीचा मृत्यू
Navi Mumbai Crime News: नवी मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने बाथरुममध्ये प्रसूती करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातच तिचा जीव गेला आहे.
Navi Mumbai Crime News: कुटुंबीयांच्या नकळत घरीच प्रसूती करण्याचा हट्ट एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. अविवाहित तरुणाची बाथरुममध्ये प्रसूती करतानाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या नवजात बाळाचादेखील दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे मुळ गाव रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील आहे. ती तिथे तिच्या आई व भावंडासह राहते. मात्र, मे महिन्यात शाळेला सुट्ट्या असल्याने तरुणी तिच्या आई व भावंडासह वाशीतील जुहुगाव येथे राहण्यास आली होती. भावंडाची शाळा सुरू झाल्यामुळं आई पुन्हा श्रीवर्धनला निघून गेली. तर, तरुणी वाशीतील घरी वडिलांसोबतच राहत होती.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे तरुणीचे वडील कामावर निघून गेले. तरुणी घरी एकटीच असल्याने ते दररोज तिला फोन करुन चौकशी करत असे. त्यादिवशीही त्यांनी तिला फोन केला. मात्र तिने फोन उचलला नाही. ते सतत तिला फोनवरुन संपर्क करण्याचा प्रय़त्न करत होते. मात्र, तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने वडिलांनी शेजाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले.
शेजाऱ्यांनी तिला अनेकदा हाका मारुनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी शेजारच्या खिडकीच्या माध्यमातून दरवाजाची कडी उघडली आणि आत प्रवेश केला. तेव्हा आतील दृष्य पाहून ते हादरले. तरुणी बाथरुममध्येच बेशुद्धावस्थेत पडली होती. तिची प्रसुती झाली होती नवजात बाळदेखील तिथेच पडले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी तिला वाशीच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.
तरुणीला रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला होता. तर, बाळ जिवंत होते. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुसऱ्या दिवशी बाळाचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, तरुणीवर अत्याचार झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्यावेळेस तिच्यावर अत्याचार झाले तेव्हा ती अल्पवयीन होती. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा श्रीवर्धन येथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं पुढील तपास तिथे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली आहे.