पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, प्रकाश आंबेडकरांचा शासनाला अखेरचा इशारा
३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले करण्याची मागणी
मुंबई : राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
'वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. शासनाने पानटपऱ्या, केस कर्तनालाय यांची दुकाने व इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. शासनाला इशारा दिलेला आहे. ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झाले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिरात प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,' असे आवाहनही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.