President Rule | राष्ट्रपती राजवट म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्रात लागू होईल का?
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ? ती कधी आणि का लागू केली जाते ते पाहूया!
President Rule/ Emegency : राज्यातील राजकीय वातावरण विविध कारणांनी ढवळून निघालेले असताना. विरोधकांनी संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. राज्यातही काही नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ? ती कधी आणि का लागू केली जाते ते पाहूया!
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांच्या गाडी ठेवण्याच्या प्रकऱणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा सहभाग असणे. त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप... या अतिगंभीर प्रकरणांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था मोडकळीस आल्याचे सांगत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट कधी लागू केली जाते?
घटनेच्या कलम 355 राज्यांचे बाहेरील आक्रमणांपासून संरक्षण करणे, राज्यातील अंतर्गत शांतता विस्कळीत न होऊ देणे... हे केंद्र सरकारचे कर्तव्य असते.
घटनेच्या कलम 356 नुसार राज्यातील घटनात्मक यंत्रणा विस्कळीत झाल्यास तसेच घटनात्मक पद्धतीने सरकार काम करीत नसल्याचा अहवाल राज्यपालांना राष्ट्रपतींना पाठवता येतो.
तसेच, राज्य केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार काम करीत नसल्यास तसा अहवालही राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवू शकतात.
राष्ट्रपती स्वतःदेखील संबधित राज्यात घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्याच्या कारणावरून राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेऊ शकतात.
वरील कारणांच्या आधारी राष्ट्रपती संबधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतात.
राष्ट्रपती राजवटीचा कालावधी
राष्ट्रपतींनी संबधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असेल तर, लागू केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यापर्यंत असते.
राष्ट्रपती राजवट वाढवायची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो.
राष्ट्रपती राजवट वाढवल्यास एकूण सहा महिन्यांपर्यंत ( दोन महिने + चार महिने) अस्तित्वात राहू शकते.
अशा प्रकारे संसदेतील दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वाढवली जाऊ शकते.
तसेच कोणत्याही राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट 1 वर्षापेक्षा जास्त वेळ अस्तित्वात राहू शकत नाही.
देशात राष्ट्रीय आणिबाणी असल्यास किंवा देशातील कोणत्याही भागात आणिबाणी असल्यास आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने संबधित राज्यात नव्याने निवडणूका घेणे शक्य नसल्याचा अहवाल दिल्यास राष्ट्रपती राजवट एका वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकते.
राष्ट्रपती राजवट कशी उठवता येते?
एखाद्या राज्यात लागू केलेली राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती कोणत्याही वेळी संसदेच्या परवानगी शिवाय उठवू शकतात.
महाराष्ट्रातील सध्याच्या घटना पाहता, संसदेत काही खासदारांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी या कलमांच्या किंवा नियमांच्या चौकटीत आहे की नाही. हे येता काळ ठरवेल.