आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; वेळेत प्रश्नपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा संताप
आजही अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळ पहायला मिळाला.
योगेश खरे, नाशिक : राज्य सरकारकडून घेण्यात येणारी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आज 24 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली होती. परंतू आजही अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेची वेळ झाली तरी प्रश्नपत्रिका मिळाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. नाशिकच्या गिरणारे केंद्रावर हा गोंधळ पाहायला मिळाला. प्रश्नपत्रिका न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते.
हीच परिस्थिती पुण्यातील काही केंद्रावर देखील असल्याची माहिती मिळत आहे. आबेदा इनामदार कॉलेज, कॅम्प, पुणे येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे, सकाळचे १०:०२ वाजूनही विद्यार्थ्याना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनावर सवाल उपस्थित केले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया...
प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सला असलेला डिजिटल लॉक परीक्षेच्या काही मिनिटे अगोदर उघडायचा असतो. एका सेंटरवर तो डिजिटल लॉक उघडला नाही. त्यामुळे 5 ते 10 मिनिटांचा उशीर झाला. वरिष्ठांनी योग्य त्या सूचना देऊन तो उघडण्यात आला. आणि परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांना योग्य ती वेळ वाढवून देण्यात येईल.