नागपूर : सीएए आणि एनआरसीबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांनी कार्यक्रम आयोजित करू नयेत अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र असं असूनही नागपूरातील एका शाळेने असा कार्यक्रम आयोजित केला आहे. नागपुरातील धरमपेठ शिक्षण संस्थेने येत्या २५ जानेवारी रोजी सीएए कायद्याबाबत जनजागृती करणारा कार्यक्रम आयोजित केला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यासंदर्भात व्याख्यान ठेवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका शाळेकडूनही असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शाळेला शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशा सूचना केल्या होत्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांचा किंवा शैक्षणिक परिसराचा वापर कोणताही राजकीय विचार पसरवण्यासाठी होता कामा नये अशा सूचना देण्याबाबतही शाळांना सांगण्यात आले आहे. 


राजकारण करायला इतर व्यासपीठ उपलब्ध आहेत, मुलांच्या कोवळ्या मनाशी खेळू नका, अशी भूमिका शिक्षण मंत्र्यांनी घेतली होती. नागपूर हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जातो. सरकारकडून याबाबत परिपत्रक काढण्यात आलं असूनही नागपूरच्या एका शाळेने असा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमामुळे सरकारकडून घालण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता या शाळेवर सरकार काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.