अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात दूध दरवाढीसाठी भाजप, रासप, रयत क्रांती, शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. पण, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा दूध आंदोलन पेटणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि युती पक्षच्या वतीने हे आंदोलन असून १३ ते १९ ऑगस्ट पर्यंत होणार आहे. राज्यातील जवळपास ५ लाख दूध उत्पादक शेतकरी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध दरवाढी संदर्भात पत्र लिहणार असल्याची माहिती माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडें यांनी दिली.


सध्याच्या घडीला दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. दुधाला केवळ १६ रुपये लिटर इतका भाव आहे. त्यामुळे दुधाला तीस रुपये, गाईच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान, दूध पावडर निर्यातीला ५० रुपये अनुदान द्यावे ही भाजप आणि मित्र पक्षाची मागणी आहे.



दूध दरवाढीच्या या मुद्द्याबाबत अधिक माहिती देत अनिल बोंडे म्हणाले, दरवाढी संदर्भात मागील महिन्यात आम्ही जिल्ह्याधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. त्यांनतर राज्यभर आंदोलन करुनही शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही त्यामुळे हे आता मुख्यमंत्री यांना ५ लाख दुध उत्पादक शेतकरी हे पत्र लिहणार आहेत'.