परभणीच्या मोर्चात धनंजय मुंडे निशाण्यावर, मोर्चेकऱ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
संतोष देशमुखांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांच्या या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर होते. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणीत मराठा मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परभणीच्या या मोर्चात धनंजय मुंडे हेच आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळालं. मोर्चातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पहिल्या दिवसापासून या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर येतंय. विरोधकांनी याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
नरेंद्र पाटील यांनी तर थेट नाव घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. तर खासदार संजय जाधव यांनी तर मंत्री धनंजय मुंडे यांना नैतिकतेची आठवण करून देत राजीनाम्याची अपेक्षा व्यक्त केलीय.
मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी तर धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आल्यास राज्यात फिरू देणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता थेट जेलवारीचा इशारा दिलाय.
देशमुखांच्या 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात यश
संतोष देशमुखांच्या 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात तब्बल 25 दिवसांनी यश आलंय. अजूनही एक मारेकरी फरारच आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा आरोपींच्या मागावर होत्या. पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला. एक आरोपी अजूनही फरार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेनंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आता महायुती सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का, हे पाहणं आता हे बघावे लागणार आहे.