सांगली : मुख्यमंत्रीपदासाठी जनता शुभेच्छा आणि आशीर्वाद देते आहे. पण पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांच्या प्रचार सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष हे मुंबईतल्या एकमेव लढतीकडं आहे. ती लढत म्हणजे वरळीची, कारण येथून ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिलेच ठाकरे आहेत. आदित्य यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं शिवसैनिकांकडून दावा सुरु झाला आहे. वरळीतून उमेदवारी घोषित करताना आदित्य ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. आदित्य ठाकरे एक तरुण चेहरा असल्याने आणि काम करण्याची त्यांची पद्धत ही तरुणांना आकर्षित करणारी आहे. शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या रुपात एक अभ्यासू नेता तयार झाला आहे. 


मुख्यमंत्री किंवा आमदार बनण्यासाठी नाही तर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.


आदित्य ठाकरे यांना वेगवेगळ्या स्तरातून पाठिंबा मिळत आहे. बॉलिवुड अभिनेता संजय दत्तने देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं समर्थन केलं आहे. मंगळवारी संजय दत्तने एक व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 


मुख्यमंत्रीपदावर शिवसेना दावा करत असली तरी देखील झी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी, देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री होतील असं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय़ निकालानंतर होईल असं देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. एकाच टप्प्यात 288 जागांसाठी मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.