वर्धा : जिल्ह्यातील देवळी तालुक्यात स्फोटक निकामी करण्याची ठिकाणी झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान,  पूलगावच्या दारुगोळा डेपोत आज सकाळी झालेल्या स्फोटात ६ जणांचा बळी गेला.. तर १० हून अधिकजण जखमी झालेत. स्फोटकं निकामी करताना ही दुर्घटना घडल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिले आहे. तर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळं जिवीतहानी झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज झालेल्या स्फोटात सोनेगावमधील तीन आणि केळापूर गावातील दोघांचा मृत्यू झाला. केळापूर गावातील प्रवीण मुंजेवार व राजकुमार भोवते, तर सोनेगाव मधील प्रभाकर वानखेडे,विलास पचारे व नारायण पचारे यांचा मृत्यू झाला. या ग्रामस्थांच्या मृत्यूस स्फोटके निकामी करण्याचे कंत्राट घेणारा कंत्राटदार जबाबदार असल्याचे ग्रामस्थ व मृतांच्या कुटुंबीयांनी केला. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय कंत्राटदार हा स्फोटके निकामी करण्यासाठी रोजंदारीवर आजू बाजूच्या गावातील मजूर घेऊन जातो मात्र, त्यांना पुरेसा मोबदला देखील देत नसल्याचे ग्रामस्थांच म्हणणे आहे.


या स्फोटाला नेमकं जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होतोय. सैन्य अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळंच हा प्रकार घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी केलाय. दरम्यान, पूलगावमध्ये झालेला स्फोट हा अपघात असल्याचं स्पष्टीकरण भारतीय लष्कराकडून देण्यात आलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे याआधी २०१६ मध्ये देखील पुलगावच्या या दारुगोळा डेपोत भीषण स्फोट होऊन, मोठं अग्नितांडव उसळलं होतं. त्यावेळी लेफ्टनंट कर्नल आर. एस. पवार आणि मेजर मनोज कुमार यांच्यासह १६ जवान शहीद झाले होते.