मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आता मुलांच्या ऑनलाइन शाळा सुरू आहेत. त्यामुळे मुलं आपला जास्त वेळ मोबाईलवर घालवत असतात. बऱ्याचदा ते काय करतात याकडेही पालकांचं लक्ष नसतं. मुलं जे पाहतात त्याची परिणामकारकता ओळखण्याची समजून घेण्याची त्यांची क्षमता नसते. त्यामुळे बऱ्याचदा धक्कादायक प्रकार घडतात. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या पुण्यात एक भयंकर प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील पालकांची झोप उडाली असून खडबडून जागे झाले आहेत. एका 12 वर्षांच्या मुलानं 4 वर्षांच्या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेनंतर मुलावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेनंतर पिंपरी चिंचवड परिसरात खळबळ उडाली. पीडित मुलीने हा सगळा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. या बहिणीने आपल्या आईला ही घटना सांगितल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पीडित मुलीच्या आईनं या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पालकांनाही आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी पालकांना आवाहन केलं आहे. मुलं काय करतात, कुठे जातात तासंतास मोबाईलवरही काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या शाळा बंद असल्यानं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या हातात तासंतास फोन असतो. मुलं अनेकदा क्लास सोडूनही इतर गोष्टी करत असतात. त्यामुळे मुलं मोबाईलवर काय करतात कोणत्या गोष्टी पाहतात याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं असंही म्हटलं आहे.