एटीएम मशीन चोरणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश
पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी एटीएम मशीनचीच चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.
नितीन पाटणकर, प्रतिनिधी, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी एटीएम मशीनचीच चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पण तपासात समोर आलेल्या या चोरट्यांच्या कारनाम्यांनी पोलीस ही चक्राऊन गेलेत.
एटीएम काही क्षणात चोरून पसार होता यावं यासाठी या चोरट्यांनी गाडीतच हायड्रोलिक पुली आणि रेलिंग बसवल्या होत्या. त्यामुळे हूकच्या मदतीने उखडून काढलेल अख्ख मशीनच मिनीट भरातच गाडीत यायचं.
हॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अँड फ्युरियस या सिनेमातून प्रेरणा घेऊन चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीन चोरण्य़ासाठी एक खास गाडी तयार केली. स्कॉर्पिओ गाडीला हायड्रोलिक मेकॅनिझम लावून अख्खं एटीएमचं चोरीला नेलं जायचं.
दिलीप मोरे, शिरीज महमूद बेग, मोहिद्दीन जाफर बेग, मलीकजान हनीकेरी या चौघा एटीएम चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एटीएम फोडणारे आपण अनेकदा पाहिले असतील पण संपूर्ण एटीएम चोरून नेणारे हे चोर पोलिसांनी पुण्यात पकडलेत.
एटीएम चोरी करण्यापूर्वी हे आरोपी एटीएमच्या परिसराची रेकी करत होते. त्यानंतर एटीएममधील कॅमे-याच्या वायर कट करून अडीच मिनीटात चोरलेलं एटीएम स्कार्पिओ गाडीत हायड्रोलिक पुलीच्या साहाय्याने घेवून फरार होत. आरोपींनी ऑक्टोबर २०१७ मध्ये पुण्यातील खडीमशीन चौकातील एटीएम चोरून नेले होते. यामध्ये १६ लाख ४८ हजार रुपये होते.
बुध्दी आणि कला ही कुणाची मांडलिक नाही. पण तिचा वापर कसा कराव याचा निर्णय मात्र तुमच भविष्य ठरवू शकतं. या हुशार आरोपीचं भविष्य आता तुरूंगात असणार आहे.