हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : कोरोना व्हायरसने जगासह देशभरात धुमाकूळ घातलाय. या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा कॉलेजांना सरकार कडून ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र राज्यातील अशी ही एक आगळी वेगळी शाळा जिथे विद्यार्थ्यांना घरी राहूनही शाळेतून शिक्षण दिले जाते. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषदेच्या शाळेने विद्यार्थ्यांना झूम-मीटिंग ॲप्लिकेशनद्वार घरी दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण घेऊन सुट्टीवर मात केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा कमी दिवसात नावारुपाला आली आहे. सध्या कोरोनाच्या सावटामुळे ऐन परिक्षेच्या दिवसांत शाळा बंद ठेवण्यात आल्या मात्र शाळेला सुट्टी जाहीर झाली तरी वाबळेवाडीच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे शिक्षणाचा हट्ट धरला आणि शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाचा नवा पर्याय शोधून शिक्षण पद्धतीत नवा पायंडा पाडलाय.


इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सहभाग नोंदवला. एकावेळी १२० विद्यार्थीं या ऑनलाइन शिक्षण पध्दतीत सहभागी होतं आहेत. दिवसातुन तीन वेळा ऑनलाईन क्लास घेतले जातात यातुन विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणाप्रमाणेच शिक्षण मिळतय..



विद्यार्थ्यांनीही या ऑनलाईन शिक्षणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपल्या घरी लॅपटॉप मोबाईल टॅबलेटचा वापर करून आपली शिक्षणाची गोडी नियमित चालू ठेवली असून सुट्टीच्या काळातही आपले शिक्षण सुरू ठेवले आहे.


सर्व विद्यार्थी एकाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येऊन येतील यासाठी झूम-मीटिंग ॲप्लिकेशनची चाचणीही सुट्टीच्या अगोदर घेण्यात आली. त्यानुसार सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड काढुन वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे यशस्वी शिक्षण सुरु झाले.


एकीकडे देश कोरोनावर मात करण्यासाठी लढतोय तर दुसरीकडे याच देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी आपल्या शिक्षणात खंड पडु नये यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. हिच जिद्द पुढील काळात या मुलांना यशस्वी शिखरावर जाण्यासाठी मदत करेल हेच या निमित्ताने स्पष्ट होत आहे.