पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी, ससून रुग्णालयातील 3 जणांचं निलंबन... ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं
Pune Porsche Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आलं. हा कारनामा ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला असून तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.
Pune Porsche Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल (Blood Sample) बदलणाऱ्या तीन जणांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospital) डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळसह शिपाई अतुल घटकांबळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.अजय तावरेंच्या सांगण्यावरून हरनोळ आणि घटकांबळेंनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं उघडकीस आलंय. पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालने अजय तावरेशी तब्बल 2 तासांत 14 वेळा फोन केल्याचं उघड झालंय. 19 मे रोजी म्हणजेच अपघाताच्या दिवशी सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान एकमेकांना व्हॉट्सअॅप आणि फेसटाईमच्या माध्यमातून कॉलिंग केल्याचं समोर आलं असून, आता पोलीस या दोघांमधील मध्यस्ती कोण होता? याचा शोध घेतायत.
सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
पुणे कार अपघात प्रकरणी निवडणुकीनंतर गौप्यस्फोट करणार असा इशारा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) दिलाय. मात्र, तोपर्यंत अजय तावरेंची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं अंधारेंनी म्हटलंय. अनेकांची नावं आपल्याकडे आहेत ती समोर आणणार असं तावरे म्हणालेयत. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी तावरेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती अंधारेंनी व्यक्त केलीय. इतकंच नाही तर अजय तावरेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण असून, तावरे, सापळे आणि चंदनवालेंचा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध काय?. अजय तावरे हा ब्लड सॅम्पल बदलण्यापुरताच मर्यादित नाहीये. तर गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं. मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारेंनी केलाय. तर डॉ. तावरेची एवढीच काळजी असेल तर अंधारेंनी आयुक्तांशी बोलावं अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिलीय.
कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा संशय
गुन्ह्याचा तपास भरकटवण्याच्या उद्देशाने डॉक्टर तावरेनेच ब्लडचे सॅम्पल बदलण्याचा कट रचला होता. त्यासाठी ससूनमधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे यांना डॉक्टर तावरेनेच 3 लाख रुपये दिल्याचं समोर आलंय. या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांकडून तांत्रिक पुरावे जमा
पुणे कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या अर्थात AI च्या मदतीने प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी 'एआय'मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही' फुटेज,कारचा वेग रस्ता गाडीचे मॉडेल हे सगळं हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे