Pune Accident Case : राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव आणि पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले, असा आरोप काँग्रेसने (Congress) केलाय. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच (CBI) झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते, यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील 36 अवैध पब पाडावे लागले अशी माहितीही नाना पटोले यांनी दिलीय.


गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स
गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारलं तरीही त्यांना 10 तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला.


पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावरेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, इथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावरे यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री आणि आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.