सरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; `आदर्श सरपंच` म्हणून पंचक्रोषीत होते फेमस
Junnar News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : जुन्नर तालुक्यातील (Junnar News) आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी येथील वयोवृद्ध माजी आदर्श पुरस्कार विजेते सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे. घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीच्या धुरामुळे दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारुती भाऊ साबळे (वय 83)व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे (वय 73) अशी मृत पती पत्नीची
नावे आहेत.
आपटाळे येथील साबळेवाडी या छोट्या वस्तीत मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपले होते. रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला. तसेच घरात आग पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली. घरात लागलेली आग विझवण्यासाठी दोघांनी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडलाने श्वास गुदमून दोघेही जागीच कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
"नागरिकांकडून माहिती मिळाली की एक वृद्ध दाम्पत्य या घरात राहत होते. घराची पाहणी केली असता एक कपाट जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. आग लागल्यानंतर विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दार आणि खिडक्या बंद होत्या. त्यामुळे संपूर्ण घरात धूर झाला होता. धुरामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक तपासात दिसत आहे," असे जुन्नरचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
"दरवाजा बंद असल्याने पतीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर जोरात ढकलून दरवाजा उघडला तेव्हा घरात काळोख दिसला. त्यानंतर आरडाओरडा करुन मी लोकांना माहिती दिली. रात्री 12 वाजेपर्यंत ते दोघेही जागे होते. वीज नसल्याने त्यांनी रात्री दिवा लावला होता," असे शेजारच्या महिलेने सांगितले.
भाईंदरमध्ये पुठ्ठा बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग
भायंदर पश्चिम येथील माध्यमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या पुठ्ठा बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बंद कंपनीतून अचानक आगीचे लोळ उठू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अखेर अग्निशन पथकाच्या जवानांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. कंपनीत सर्व माल ज्वलनशील असल्याने काही क्षणातच हा माल जळून खाक झाला होता. अखेर पाच पाण्याचे बंब वापरून अथक प्रयत्नांनी अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा माल जळून नुकसान झाले आहे.